पिंपरी( प्रतिनीधी )(दि. ११ सप्टेंबर २०२३) पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी पवना थेट पाईपलाईन प्रकल्पावरील स्थगिती महायुती सरकारने उठवली. त्यामुळे भविष्यातील शहराची पाणी चिंता मिटली आहे. या प्रकल्पासाठी लोकनेते आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. याबद्दल महायुती सरकारचे आम्ही आभार व्यक्त करतो, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या.
शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे २०११ मध्ये पवना थेट पाईपलाईन प्रकल्पाला तत्कालीन राज्य सरकारने ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. या प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, विलास मडिगेरी, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सागर आंघोळकर, शशिकांत कदम, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे भाजपाचे राहुल जवळकर, संजय मराठे, अमर अभियान, रमेश काशीद, नवनाथ जांभुळकर, नवीन लायगुडे, विनायक भोंडवे, अजय दूधभाते, संतोष ढोरे, किरण सोनवणे, जवाहर ढोरे, सचिन सावंत, शांतराम पिंजन आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने पवना थेट पाईपलाईन प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली. शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण आणि भविष्यातील शहराची गरज लक्षात घेता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द करावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाने केली होती. त्याला यश मिळाले आहे.
No comments:
Post a Comment