Monday 31 August 2020

बँक ऑफ फायनान्स कंपन्याचा तगादा बंद करा..... काळुराम( अण्णा) गायकवाड


पिंपरी (लोक हिताय न्यूज )(दि. 31 ऑगस्ट 2020) कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने 22 मार्च पासून लॉक डाऊन केले. तेंव्हा पासून प्रवासी व माल वाहतूक करणा-या सर्व व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीमध्ये सर्व बँका व फायनान्स कंपन्यांच्या वसूली अधिका-यांकडून पैसे भरा अन्यथा वाहने जप्त करु असा तगादा लावला जात आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 2 सप्टेंबर) आमचे प्रतिनिधी मंडळ सर्व बँका व फायनान्स कंपन्यांच्या कार्यालय व विभागीय कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहेत. यानंतरही जर बँका व फायनान्स कंपन्यांनी त्रास दिला तर दिनांक 10 सप्टेंबर रोजी राज्य भरातील सर्व प्रवासी व माल वाहतूक व्यावसायिक आपली वाहने बॅंका व फायनान्स कंपन्यांकडे जमा करुन बेमुदत आंदोलन करतील असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष काळूराम (अण्णा) गायकवाड यांनी दिला.
          सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड येथे प्रवासी व माल वाहतूक करणा-या विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद बागलाने, सचिव भालचंद्र बोराटे, कार्याध्यक्ष दशरथ पानमंद, सहाय्यक दिपक कलापुरे, सल्लागार दत्ताशेठ भेगडे, रणजीत फुले तसेच पिंपरी चिंचवड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे बंडूराज काळभोर, छत्रपती कॅब संघटना प्रदेश सरचिटणीस वर्षाताई शिंदे पाटील, अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे राजेश नल्ला, ऑल इंडिया माल वाहतूक संघ पिंपरी चिंचवड अध्यक्ष भावसार, स्वराज्य वाहन चालक, मालक संघटना अध्यक्ष स्वामी गुजर, मावळ बस मालक संघटना अध्यक्ष रोहिदास म्हसे आदी उपस्थित होते.
        सल्लागार भेगडे म्हणाले की, सरकार ज्या प्रमाणे शेतक-यांना कर्ज माफी देते, त्याप्रमाणे वाहतूक क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांना एक वर्ष किमान व्याज माफ करावे. तसेच लॉक डाऊन काळातील गाड्यांच्या विम्याचे भरलेले आगाऊ हफ्ते पुढील काळासाठी ग्राह्य धरावे. अन्यथा वाहतूक व्यावासायिकांवर देखिल शेतक-यांप्रमाणेच आत्महत्येची वेळ येईल.
          दिपक कलापुरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात प्रवासी व मालवाहतूक करणारी सव्वा लाखांपेक्षा जास्त वाहने आहे. यावर पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. व्याज माफी मिळाली नाही तर आणखी परिस्थिती बिकट होऊ शकते.
     रणजीत फुले म्हणाले की, बस मालक सर्व साधारणपणे एका बसचा एक लाखापासून सहा लाख रुपयांपर्यंत आगाऊ कर भरतो. तसेच साठ हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत आगाऊ विमा भरतो. यातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. सरकारने एसटी प्रवासी वाहतूकीला परवानगी दिली. त्याप्रमाणे खाजगी प्रवासी वाहतूकीला व डेली सर्व्हिसला देखिल ताबडतोब परवानगी मिळावी.
       वर्षाताई शिंदे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात पाच हजारांहून जास्त कॅब आहेत. राज्यातील दुष्काळी व नापीक भागातील शेतक-यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांनी कर्ज काढून या कॅब घेतल्या आहेत. लॉक डाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बंद आहे. या नव व्यावसायिकांना फायनान्स कंपन्यांच्या तगाद्यामुळे दडपण येत आहे. बँकांनी जर त्यांची वाहने जप्त केली तर पुन्हा गावाला जाण्याऐवजी आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.
        राजेश नल्ला म्हणाले की, शाळा, महाविद्यालय कधी सुरु होतील हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. जोपर्यंत शाळा, महाविद्यालय सुरु होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी वाहतूक करणा-यांचा व्यवसाय बंदच राहणार आहे. यांना शाळा, महाविद्यालय सुरु होईपर्यंत व्याज माफी व विम्याच्या पैशांचा परतावा मिळावा.
     दिपक कलापुरे यांनी सुत्रसंचालक करताना सांगितले की, लॉक डाऊन काळात प्रवासी व मालवाहतूक करणा-या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व बँका व फायनान्स कंपन्यांना 31 ऑगस्ट पर्यंत कर्जाचे हफ्ते वसूल करु नये असे आदेश दिले आहेत. या काळातील व्याज मात्र भरावे लागणार आहे. परंतू उद्या 1 सप्टेंबर पासून आम्हा सर्व व्यावसायिकांचे कर्ज हफ्ते सुरु होणार आहेत. त्या अगोदरच सर्व बँका व फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिका-यांकडून पैसे भरा अन्यथा वाहने जप्त करु असा तगादा लावला जात आहे. याला कायम स्वरुपी पायबंद बसला पाहिजे. यासाठी बुधवारी (दि. 2 सप्टेंबर) आमचे प्रतिनिधी मंडळ सर्व बँका व फायनान्स कंपन्यांच्या कार्यालय व विभागीय कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहेत. राज्य सरकारने व केंद्र सरकारने प्रवासी व माल वाहतूक करणा-या वाहनांना सहा महिन्यांसाठी कर सवलत दिली आहे. परंतू अनलॉकची प्रक्रिया अद्यापही पुर्ण झाली नाही. जोपर्यंत देशभर अनलॉकची प्रक्रिया पुर्ण होऊन शंभर टक्के सर्व उद्योग व्यवसाय यात विशेषता: शाळा, महाविद्यालय, पर्यटन, सार्वजनिक कार्यक्रम, सभारंभ आणि औद्यागिक उत्पादन सुरु होत नाही, तोपर्यंत प्रवासी व माल वाहतूकदारांचा व्यवसाय शंभर टक्के सुरु होणार नाही. तोपर्यंत बँकांचे कोणतेही कर्ज हफ्ते देणे कोणालाही शक्य नाही. तरी देखिल वसुली अधिका-यांकडून तगादा सुरु आहे. यामुळे सर्व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. बँका व फायनान्स कंपन्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ प्रवासी व माल वाहतूक करणारे सर्व व्यावसायिक दिनांक 10 सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व प्रवासी व माल वाहतूक व्यावसायिक आपली वाहने बॅंका व फायनान्स कंपन्यांकडे जमा करु बेमुदत आंदोलन करतील. यानंतर उद्‌भवणा-या परिस्थितीत संबंधित बँक व फायनान्स कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील असेही कलापुरे म्हणाले.

No comments:

Post a Comment