Saturday, 4 April 2020

महावीर जयंती हनुमान जयंती शब -ए बारात. साठी घराबाहेर पडू नका पूजा -आर्चा. प्रार्थना घरातच करा..उपमुख्यमंत्री. अजित पवार

Lok hitay news.





मुंबई, (लोक हिताय न्यूज. प्र. )दि. 3 :- ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे.
राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया,  असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.   

कोरोना उपायीजनांसंदर्भात भारती हॉस्पिटलच्या तयारीची विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली

Lok hitay news.




पुणे,(लोक हिताय न्यूज. प्र. ) दि.४: भारती हॉस्पिटलमधील  कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला.
यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार,भारती हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिष्ठाताडॉ. संजय ललवाणी, आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ.शिवकुमार अय्यर यांच्यासह ररूग्णालयातील प्रमुख डॉक्टर  उपस्थित होते. 
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील एकूण क्षमता,आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

Thursday, 2 April 2020

प्रत्येक गरजू व्यक्तीला शासकीय धान्य उपलब्ध करून देण्यात यावी मुख्यमंत्रीयांच्या कडे निवेदनातून मागणी .. राहूल डंबाळे

Lok hitay news.








पुणे. लोक हिताय न्युज. दि. 2.एप्रिल.
जगभर मृत्यूचे थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण देशभरात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला असून या 21 दिवसाच्या लॉकडाऊन कालावधी मुळे गोरगरीब जनतेला अनंत हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार जिकिरीचे प्रयत्न करीत आहेत.

माननीय महोदय या जिकिरीच्या कालावधीमध्ये उदरनिर्वाह चालवण्यासाठी किमान रेशनिंग वरील शिधा उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा राज्यातल्या मोठ्या घटकांकडून व्यक्त होत आहे. व ती रस्ता असल्याने त्याबाबत आपण देखील गंभीरतेने विचार करत आहोत असे मला वाटते.

गरजू व गोरगरीब जनतेला शासकीय धान्य व शिधा शिधापत्रिकेच्या आधारावरच आपण आजवर देत आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये यामध्ये काही अंशी बदल करून शिधापत्रिका नसणाऱ्या गरजवंताला देखील शासकीय धान्य व शिधा उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशा शिधापत्रिका नसणाऱ्या परंतु गरजू व्यक्तींना, कुटुंबांना शासकीय धान्य देण्यासाठी आपण  खास निर्णय घेऊन त्यांना धान्य द्यायला हवे.

शिधापत्रिका नसलेल्या गरजू व्यक्तींचे
अ) आधार कार्ड ,मजूर म्हणून शासकीय, निमशासकीय व अशासकीय नोंदीचा पुरावा.
ब) असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचे शासकीय ,निमशासकीय व शासकीय नो नसल्याचा पुराव्याची नोंद.
ग्राह्य धरून त्यांना सदर धान्याचे वाटप करण्यात यावे अशी विनंती आम्ही आपणास या निवेदनाद्वारे करीत आहोत.


कोरोना संसर्गांन हॉस्पिटल क्वारंटाईन होण्यापेक्षा स्वेच्छेनं होम क्वारंटाईन व्हा स्वतःला कुटुंबाला वाचवा... उपमुख्यमंत्री अजित पवार

Lok hitay news.







मुंबई, lok hitay news. दि. 2 :- ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्‌’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा  त्यांनी दिला आहे.
‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजीबाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची  सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.
राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी  जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही  सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं 

Wednesday, 1 April 2020

निजामुद्दीन तब्लिगी ए -जयंतीच्या मेळाव्यातील 182जणांची यादी प्राप्त.. पुणे विभागात 106जन आढळले उर्वरित्यांचा तपास गतीने सुरु... विभागागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Lok hitay news

पुणे,(लोक हिताय न्युज ) दि.1: निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करतांना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व उर्वरित सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील यादीत समाविष्ट व्यक्तींना   ट्रेसिंग करण्यात आले आहे. पुणे विभागातील आढळून आलेल्या 106 पैकी 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्राव नमुने घेतले जातील. त्या व्यक्तींचा स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा  तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

Tuesday, 31 March 2020

कामगार संघटनांशी चर्चा केल्या नंतर महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी च्या वेतनात 60टक्के कपात शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्के वेतन,, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची माहिती

Lok hitay news




          मुंबई. लोक हिताय न्युज. , दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली  घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Monday, 30 March 2020

केंद्राकडून 16हजार 654कोटीची थकबाकी 31मार्च पर्यंत मीळावी. उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी केंद्राने 25हजार कोटीचे विशेष पॅकेज घावे. अजित पवार

Lok hitay news.


मुंबई, (लोक हिताय न्युज )दि. 31 :- राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट, ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्यउत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर आगामी काळात ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकाने महाराष्ट्राला 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजममंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राकडून राज्याला येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती 31 मार्चपर्यंत देण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत केंद्राकडून येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी मिळावी तसेच ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. राज्याची आर्थिक स्थिती व राज्यासमोरील आव्हानांची माहिती त्या पत्रात दिली आहे. केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात तीन आठवड्यांची टाळाबंदी जाहीर केली आहे. या टाळाबंदीमुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु ‘कोरोना’ आणि टाळाबंदीमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्यातच केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे 1687 कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे 14 हजार 967 कोटी रुपये अशी एकूण 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत राज्याला मिळावी तसेच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी  25 हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.