Lok hitay news
(लोक हिताय न्युज.. प्र दिलीप देहाडे )
(लोक हिताय न्युज.. प्र दिलीप देहाडे )
वाहतूक समस्येबाबत पोलिस अधिकाऱ्यांची अनास्था; आमदार लक्ष्मण जगताप यांनी कारवाईचा दिला इशारा
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्येबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. २९) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दांडी मारल्याने आमदार जगताप यांनी वाहतूक विभागातील पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील वाहतूक समस्येबाबत काही देणेघेणे आहे की नाही?, असा सवाल केला. या महत्त्वाच्या विषयांवर आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी दुर्लक्ष करतात की काय?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. तसेच वारंवार सूचना करूनही शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेत हक्कभंग उपस्थित करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते प्रशस्त असले तरी ट्रॅव्हल्स, खासगी बसेस व अन्य वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना चिंता व्यक्त करणारे पत्र दिले होते. शहरातील वाहतूक सुरळित सुरू राहावी तसेच अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांच्या बाजूला बेशिस्तपणे पार्किंग केले जाणारे खासगी ट्रॅव्हल्स, खासगी कंपन्यांच्या गाड्यांना शिस्त लावावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २९) चिंचवड येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला वाहतूक विभागाचे सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व वाहतूक पोलिस निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांवरील बैठकीला दांडी मारली. वरिष्ठ अधिकाऱ्यालाच शहरातील वाहतूक समस्येबाबत काहीच देणेघेणे नसेल तर शहराच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याची चिंता आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. वाहतूक समस्येबाबत वारंवार सूचना करूनही वाहतूक विभागाचे अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी असे वागत आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.
शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. परंतु, वाहतूक विभागाचे अधिकारी बेफिकीरपणे वागत असतील तर विधानसभेत हक्कभंग उपस्थित करण्याचा इशारा आमदार जगताप यांनी दिला. अधिकाऱ्यांचा असा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नसल्याचे त्यांनी पोलिस आयुक्तांना ठणकावून सांगितले. तसेच बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले
No comments:
Post a Comment