Saturday 7 March 2020

करोना. दक्षता घ्या. भीती नको.. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील

.Lok hitay news



 (लोक हिताय न्युज. )दि. 7.मार्च
करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. करोना विषाणू आजाराबाबत सोशल माध्यमाव्दारे पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. गर्दीत जाणे टाळावे तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी, परंतु भीती बाळगू नका, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे. करोना विषाणू आजाराची लक्षणे, उपाययोजना, सद्यस्थिती आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी साधलेला संवाद..
    करोना विषाणू आजाराची लक्षणे- साध्या सर्दी, खोकल्यापासून ते सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) किंवा मर्स (Middle East Respiratory Syndrome ) यासारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडीत म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारा सारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे साधारणपणे आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्यातून व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो.
आजार होऊ नये, यासाठी घ्यावयाची खबरदारी - रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जात असून आरोग्याच्या हितासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी...
* श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी.
* हात वारंवार धुवावा.
* शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा.
* अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.
* फळे, भाज्या धुवूनच खाव्यात.
 त्याचबरोबर श्वसनास त्रास होणा-या व्यक्तींनी, हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास तसेच प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
 सद्यस्थिती - ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीन देशातील वुहान शहरात नवीन करोना विषाणूचा उद्रेक घोषित केला. यानंतर चीनच्या इतर शहरात आणि प्रांतातही या आजाराचे रुग्ण आढळले. देशात केरळमध्ये या आजाराचे ३ रुग्ण, दिल्ली २ व तेलंगनामध्ये १ व राजस्थान मध्ये १६ तर उत्तर प्रदेशमध्ये ८ रुग्ण आहेत.
उपाययोजना-  करोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी  केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
* आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील २१ विमानतळांवर करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या स्क्रिनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे.
* बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा - जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतात येत आहेत, त्यांची माहिती दररोज विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जात आहे. बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस या सर्व प्रवाशांचा दैनंदिन पाठपुरावा केला जातो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात येत आहे. दैनंदिन पाठपुराव्यात एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.
* प्रयोगशाळा निदान व्यवस्था - नवीन करोना विषाणू आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही), पुणे येथे करण्यात आली आहे. संशयित रुग्ण कोणास म्हणावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुस्पष्ट सूचना दिलेल्या असून त्याचे पालन करण्यात येत आहे. एनआयव्ही पुण्याव्यतिरिक्त राज्यातील दोन विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये (व्ही.आर.डी.एल.) देखील करोना निदानाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे या प्रयोगशाळा आहेत.
* विलगीकरण आणि उपचार व्यवस्था - संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर रुग्णांसाठी विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याबरोबरच मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात खाजगी रुग्णालयांमध्ये देखील हा कक्ष सुरु केला आहे.

* औषधसाठा- प्रामुख्याने पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट), एन ९५ मास्क, ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क, इत्यादींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
* आरोग्य शिक्षण -  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे.
* नागरिकांना आवाहन - करोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मिडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय याविषयीचे संदेश पुढे पाठवू नयेत, तसेच आवश्यक असल्यास हेल्पलाईनला फोन करुन शंका निरसन करुन घ्यावे. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून सर्वांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. गर्दीत जाणे टाळावे. वारंवार हात धुवावा. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे खोकतांना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा व सामाजिक शिष्टाचार पाळावेत.
* करोना नियंत्रण कक्ष - सर्वसामान्य नागरिकांच्या करोना विषयक शंका- समाधानासाठी टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन (०२० -२६१२७३९४)  करण्यात आला असून तो सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत कार्यरत आहे.  नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या arogya.maharashtra.gov.in या संकतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

शब्दांकन - वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
   
0000000

No comments:

Post a Comment