Monday, 27 April 2020

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करावे..जिल्हा अधिकारी नवल किशोर राम

Lok hitay news..




पुणे. Lok hitay news.. दिनांक 27- देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात यावे, असे निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. खडकी छावणीतील रुग्‍णालयाला आवश्‍यक साधन सामुग्रीसाठी 50 लक्ष रुपये तात्‍काळ मंजूर करण्‍यात आले. 

            संगमवाडी, कसाई मोहल्‍ला, दर्गा वसाहत या भागात कोरोनाबाधित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यानंतर छावणी मंडळाकडून आवश्‍यक ते उपाय योजण्‍यात आले. या उपायांचा आढावा जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला. यावेळी  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे छावणीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, खडकी छावणी मंडळाचे प्रमोदकुमार सिंग, नगरसेविका पूजा आनंद, जिल्‍हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार, देहू रुग्‍णालयाच्‍या निवासी वैद्यकीय अधिकारी सुनिता जोशी, डॉ. भोसले, डॉ. गायकवाड, अधीक्षक राजन सावंत यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

            देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) रुग्‍णालयांच्‍या उपलब्‍ध साधनसामुग्रीचाही जिल्‍हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. खडकी छावणीतील  रुग्‍णालयाला आवश्‍यक साधन सामुग्रीसाठी 50 लक्ष रुपये तात्‍काळ मंजूर करण्‍यात आले असून आवश्‍यकते नुसार आणखी निधी उपलब्‍ध करुन दिला जाईल, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.  पुणे छावणी मंडळातील दवाखान्‍यातील साधनसामुग्रीसाठीचा प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी संबंधितांना दिल्‍या. या तीनही छावणी मंडळाच्‍या दवाखान्‍यात आयसीयू बेड वाढविण्‍यात यावेत, आवश्‍यकते नुसार पीपीई कीट्स  उपलब्‍ध करुन घेण्‍यात यावेत, घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्‍यविषयक सर्वेक्षण करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी सांगितले.

            छावणी मंडळातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्‍णांवर उपचार करण्‍यास नकार देत असल्‍याच्‍या तक्रारीचा उल्‍लेख करुन जिल्‍हाधिकारी राम यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. डॉक्‍टरांनी आवश्‍यक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. तथापि, जे डॉक्टर रुग्‍ण तपासणीस नकार देतील त्‍यांच्‍यावर आपत्‍ती नियंत्रण कायदा तसेच इतर कायद्यांतर्गत नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

            खाजगी रुग्‍णालयांनी रुग्णांना भरती करुन त्‍यांच्‍यावर उपचार करावेत. कोणत्‍याही कारणांवरुन रुग्णावर उपचार करण्‍यास नकार देणे चुकीचे आहे,असेही जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम  सांगितले. खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाच्‍या संशयावरुन रुग्‍णांना भरती करुन घेतले जात नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. उपचार नाकारणा-या अशा रुग्‍णालयांवरही नियमानुसार कारवाई केली जाईल, त्‍यांची मान्‍यता रद्द केली जाईल, असा इशारा त्‍यांनी दिला.

No comments:

Post a Comment