Tuesday, 7 April 2020

चिखली ग्रामस्थ व एक गाव एक शिवजयंती उस्तव समितीच्यावतीने अन्नदान दानशूर व्यक्ती व संस्था आणि मदत करण्याची चिखली ग्रम स्थानाचे आव्हान

Lok hitay news.





पिंपरी (लोक हिताय न्यूज.)  (7 एप्रिल 2020) : जगभर पसरलेल्या कोरोनामुळे भारतात मागील 13 दिवसापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. 22 मार्च रोजी झालेल्या जनता कर्फ्यूपासून गोरगरीबांचे उत्पन्न बंद झाले आहे. त्याची झळ उद्योगनगरीतील नागरिकांनादेखील बसत आहे. हातावर पोट असणारे गरीब नागरिक, लॉकडाऊनमुळे रस्त्यावरच थांबलेले ट्रकचालक, क्लिनर, बांधकाम साईटवरील मजूर, चिखली परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योगातील असंघटीत कामगार तसेच चिखलीतील धर्मराजनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, केशवनगर आणि भाजीमंडई पत्राशेड या परिसरातील शेकडो कुटुंबांची उपासमार होत आहे. त्यांना किमान एकवेळचे जेवण मिळावे या सामाजिक भावनेतून श्री क्षेत्र टाळगाव चिखलीतील ‘एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती’ तसेच ‘श्री दत्तगुरु सेवामंडळ व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र टाळगाव चिखली’तील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन अन्नदान सुरु केले आहे. चिखली गावठाणातील दत्तमंदिर येथे 27 मार्च रोजी सुरु केलेल्या या अन्नदानात पहिल्या दिवशी 200 नागरिकांना जेवणाचे पॅकेट देण्यात आले. रोज हा आकडा वाढत असून सोमवारी 2200 नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
गावातील तरूण कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मिडियातून व्हॉट्सअपग्रुपवर अन्नदान करण्याची कल्पना मांडली. यानंतर ग्रामस्थांनी मदतीचे आवाहन केले. यामध्ये अनेक युवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आणि दत्तमंदिरातील शेडमध्ये अन्नधान्य जमण्यास सुरुवात झाली. यामध्ये तांदूळ, रवा, पीठ, तेल डबे, साखर, भाजीपाला, मसाले असे जिन्नस जमा झाले. सकाळी 9 वाजता तयारीला सुरुवात होऊन सायंकाळी 6 नंतर दत्तमंदिरात अन्नदान करण्यात येते. तसेच चिखलीतील धर्मराजनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, केशवनगर आणि भाजीमंडई पत्राशेड या परिसरातील नागरिकांना जागेवर जाऊन जेवण देण्यात येते. ज्या कुटुंबांनी जेवण मिळण्याबाबत मागणी केली आहे अशा कुटुंबांला स्वयंसेवक भेट देऊन येतात. त्यांना मदतीची गरज असल्याची खात्री झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाला शक्य असल्यास दत्त मंदिरात पॅकेट देण्यात येते अन्यथा घरपोच जेवण देण्याची सुविधादेखील ग्रामस्थांनी केली आहे. या पॅकेटमध्ये मसाले भात, शिरा, पुरीभाजी देण्यात येते. बचत गटातील महिलांनी पुढे येऊन मदत केली तर बुधवारपासून चपाती व बुंदी देण्याचेही नियोजन आहे. हे अन्नदान लॉकडाऊन संपेपर्यंत सुरु ठेवण्याची चिखली ग्रामस्थांची इच्छा आहे. परंतू दिवसेंदिवस गरजूंची संख्या वाढत आहे व शिधा कमी पडत आहे. दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी या अन्नदानात मदत करण्याचे आवाहन चिखली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक दात्यांनी चिखली गावठाणातील दत्तमंदिर येथे शिधा आणून द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
---

No comments:

Post a Comment